शाळांमध्ये गेल्यावर वर्गात जाऊन तिथे काय आणि कशा पद्धतीचे कामकाज सुरू आहे? शिक्षकांच्या कामाची दिशा योग्य आहे की नाही? मुलं नीट शिकताहेत का काही अडचणी आहेत? आणखीन बरेच काही... याबाबत बहुतांश अधिकारी मंडळी फारशी जागरूक दिसत नाहीत, असेच म्हणावे लागते. समजा, याविषयी विचारलेच तर शाळेच्या अन् मुलांच्या अंतरंगात डोकवायला वेळ आहे कोठे? असा प्रतिप्रश्न उपस्थित केला जातो.
सातारा जिल्ह्यातल्या कुमठे विभागाच्या (बीट) शिक्षण विस्तार अधिकारी प्रतिभा भराडे याला पूर्णपणे अपवाद आहेत. सगळी मुलं शाळेत आली पाहिजेत. आलेली मुलं शिकली पाहिजेत. त्यांना चांगल्या दर्जाचे गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळाले पाहिजे. यासाठी झपाटल्यागत काम करणाऱ्या भराडे यांनी सरकारी चौकटीत राहून चौकटीबाहेरचे कामकाज करून दाखवलेय. त्यांनी स्वत:चे प्रशासकीय कामकाज व्यवस्थित सांभाळून, एक नेमकी दिशा पकडून विशेष नोंद घ्यावी, असे काम उभे केलेय. त्यांच्या बीटमधल्या चाळीसच्या चाळीस शाळांमधल्या मुलांच्या मनात यांनी ‘घर’ केलंय. सर्वच शाळांतली जवळपास सगळी मुलं त्यांना ‘भराडे मॅडम’ असं नावानं ओळखतात! यादेखील मुलांना नाव घेऊन हाक मारतात. हे एकाएकी किंवा सहजासहजी होत नाही. या बीटचे आगळेवेगळे वैशिष्ट्य म्हणजे विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख, शिक्षक, मुलं, पालक आणि निरनिराळे समाजघटक असे सगळेजण मैत्रीच्या धाग्याने बांधले गेलेत. एकमेकांशी एकरूप झालेत. एक ‘शैक्षणिक कुटुंब’ असे याचे नेमके वर्णन करता येईल.
भराडे यांच्या बीटमध्ये एकूण शाळा आहेत चाळीस. तेथे राबविल्या जाणाऱ्या उपक्रमांची संख्या आहे तब्बल सहासष्ट! मुलांना सर्वांगाने समृद्ध करणारे. वैशिष्ट्यपूर्ण असे. याचे कारण म्हणजे कोणासाठी करायचे? काय करायचे? कसे करायचे? याची स्पष्टता येथे काम करणाऱ्या प्रत्येकाकडे आहे. २००३ मध्ये भराडे यांनी कुमठे बीटचा पदभार स्वीकारला. काहीतरी ‘वेगळं’ करायचं, असं त्यांच्या डोक्यात अजिबात नव्हतं. पण जे काम करतोय ते तळमळीनं, चिकाटीनं आणि प्रामाणिकपणानं करायचं, असा स्वभाव. जोडीला धडपडी वृत्ती. पदभार स्वीकारल्यावर शाळा आणि मुलांना समृद्ध करण्यासाठी काय काय करता येईल, असा विचार सुरु होता. ‘आजचं शिक्षण आयुष्यातले आर्थिक प्रश्न सोडवत नाही,’ असा शिक्षण पद्धतीवर मुख्य आक्षेप घेतला जातो. याबाबत काही करता येईल का? याबाबत चिंतन सुरु असताना शाळेत शेती सुरु करण्याचं ठरवलं. पण यातली मुख्य अडचण होती ती म्हणजे शेती आणणार कोठून आणि कशी? प्रत्येक शाळेला भेट द्यायची. मनोदय शिक्षकांना सांगायचा. गावकऱ्यांशी चर्चा करायची. मार्ग निघतो का बघायचं. असं सुरु असताना बघता बघता प्रत्येक शाळेला गुंठ्यापासून पाच गुंठ्यांपर्यंत शेती मिळाली! तीदेखील लोकांच्या सहभागातून. या गोष्टीची चर्चा सुरु झाली. ती सामाजिक कार्यकर्त्या शैला दाभोलकर यांच्या कानावर गेली. या कामी त्यांचं महत्त्वपूर्ण योगदान लाभलं.
जी मिळाली ती जमीन काही काळी कसदार, सुपीक होती, असं काही नव्हतं. खडकाळ, माळरान, नापीक जमीन ताब्यात घेतली. मुलं राबू लागली. श्रमप्रतिष्ठा हे काही भाषण देऊन गळी उतरविण्याचं मूल्य नाही, ते प्रत्यक्ष काम करून अनुभव घेऊन अंगी बनवायचं असतं, हा धडा मुलं घेत होती. शेण-मलमूत्र-काडी-कचरा, तंबाखू, कडूनिंब अशा वनस्पतींचा पाला वापरून नैसर्गिक पद्धतीनं जमीनी लागवडीखाली आणल्या. उजाड, ओसाड माळरानावर तीन महिन्यात हिरवी पिकं दिमाखानं डोलू लागली. पिकविलेल्या भाजीपाल्याचा वापर मध्यान्ह भोजनासाठी केला जातो. मुलांनी स्वतः घाम गाळून पिकविलेल्या भाजीची चव न्यारीच लागणार! संपूर्ण शेती सेंद्रीय पद्धतीनं करतात. याचा परिणाम असा झाला की, मुलं घरीदेखील सेंद्रीय शेतीचा आग्रह धरू लागली. त्याचे फायदे-तोटे पटवून सांगू लागली. ‘No waste land, No waste child’ असं स्लोगन इथे बनलं आहे.
मोलमजुरी करणाऱ्या एका गरीब कुटुंबातल्या विश्वजीत सूर्यवंशी नावाच्या सहावीतल्या मुलानं घराभोवतीच्या पाच गुंठे पडीक जमिनीत भाजीपाल्याचे उत्पन्न घ्यायला सुरुवात केलीय. सुरुवातीला ‘हे काय खूळ घुसलंय तुझ्या डोकस्यात?’ असं म्हणणारे आई-वडील मुलानं कष्टानं तयार केलेल्या शेतीत खपताहेत. उत्त्पन्न घेताहेत. त्यातून त्यांच्या प्रपंचाला हातभार लागतोय! आता बाप म्हणतोय ‘माझा मुलगा कमावता झाला.’ पर्यावारणस्नेही शेती कशी करावी, याबाबत येथील या ‘प्रयोगशील शेतकऱ्यांच्या’ आकाशवाणीवर मुलाखती झाल्यात! आपला देश कृषिप्रधान. पण तो केवळ बोलण्यापुरताच. शेतकऱ्याला या देशात जी काही हिणकस दर्जाची वागणूक दिली जातेय, त्यातून श्रमाचं किती ‘अवमूल्यन’ झालंय ते दिसतंय. ‘उत्तम’ शेतीची वाट लागल्याचं चित्र दिसत असताना अशा नकारात्मक वातावरणात शेतीविषयी मुलांमध्ये प्रेम निर्माण करणं, त्याचबरोबर विज्ञान, पर्यावरण शिक्षण आणि नोकरीला पर्याय म्हणून शेतीकडं पाहण्याचा दृष्टीकोन मुलांमध्ये संस्कारक्षम वयात रुजवण्याचं अत्यंत महत्त्वाचं काम इथे सुरु आहे. ‘जीवन आणि शिक्षण’ यांचा मेळ कसा घालायचा, असा प्रश्न पडलेल्या जिज्ञासूंनी खुशाल इथं जावं. पाहावं. समजून घ्यावं.
२००४मध्ये सर्व शाळांमधल्या तब्बल ४ हजार विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी केली. दृष्टीदोष आढळलेल्या एक हजार मुलांना चष्मे दिले. त्यात ३० मुलांना डोळ्यांचे गंभीर आजार असल्याचं निष्पन्न झालं. सामाजिक कार्यकर्ते गनीभाई यांच्या मदतीनं सर्व मुलांच्या डोळ्यांवर पुण्यात शस्रक्रिया केल्या. मुलांना नवी दृष्टी मिळाली. शिक्षकांची बांधिलकी उरली नसल्याची टीका आज शिक्षकांवर होतेय. इथल्या मुलांना तिकडं न्यायला आणायला शिक्षकांनी स्वतःच्या गाड्या दिल्या होत्या. इतर काही आजार झालेल्या मुलांना तपासणी आणि उपचारासाठी डॉ. एच. व्ही. देसाई यांच्याकडे नेलं. त्यांनी उपचार केले. परंतु मुलांमध्ये कुपोषणाचं प्रमाण मोठं असल्यानं आजारांची गुंतागुंत वाढत असल्याचं कारण सांगितलं. तिकडून आल्यावर कुपोषण निर्मूलनाचा कार्यक्रम सुरु झाला. अर्थातच तज्ञांची मदत घेतली. जे घटक कमी पडतात, ते ज्यातून मिळतात त्यां भाज्या शेतीत पिकवायच्या. शाळेतच शिजवायच्या. दुपारच्या जेवणात खायच्या. अजून काही गोळ्या औषधे दिली. कुपोषण बऱ्यापैकी आटोक्यात आलंय. हिमोग्लोबीन वाढविण्यावर भर दिला जातोय.
वेगवेगळ्या अंगांनी काम पुढं जात होतं. शिक्षक आणि मुलांशी संवाद सुरु
होता. भराडे यांनी स्वतःच्या मनाची कवाडे उघडली. मुलांच्या भावविश्वात
डोकावल्या. काही मुलांचं भावविश्व पूर्णपणे पोखरलेलं असल्याचं त्यांच्या
तरल आणि संवेदनशील नजरेतून सुटलं नाही. कोणाला आई-वडील नाहीत, कोणाला
आजारांनी ग्रासलेलं. कोणाला घराची मंडळी मजुरीला पाठवतेय म्हणून शाळेत येणे
शक्य होत नाहीये. कोणाला लिहिता येतंय, पण वाचता येत नाहीये. कोणाला निबंध
लिहिता येत नाहीये. कोणाचे अक्षर चांगले येत नाहीये. नापास होण्याची भीती
कुणाला तरी सतावतेय... जेवढी मुलं तेवढे प्रश्न! आतून बाहेर हलवून
सोडणारे... अस्वस्थ करणारे... मुलांच्या विशेष गरजा होत्या. त्या लक्षात
घेऊन मुलांना ‘समजून’ घेणं सुरु झालं. मातेच्या ममतेनं कोणाच्या गालावरचे
अश्रू पुसले. कोणाला कुशीत घेऊन समजूत काढली. कोणाच्या पाठीवर शाबासकीची
थाप टाकली. कोणाला कडेवर उचलून घेतलं. त्यांच्या ‘पारख्या’ नजरेतून काही
म्हणजे काहीच सुटत नाही. मुलांचे केस, दात, नखं, कपडे, अंघोळ इथपासून आज
कुणाचा चेहरा पडलेला आहे. कोणाची कळी भलतीच खुललेली आहे... इथपर्यंत भराडे
लक्ष पुरवतात. त्यांच्या या अनुभव संपन्नतेतूनच ‘कवाडे उघडताच’ हे पुस्तक
आकाराला आलेय. मल्लिका पाटणकर, राजश्री देशपांडे आणि हमीद दाभोलकर हे
मानसोपचार तज्ञ मदतीला आले. सर्व मुलांचा बुद्ध्यांक तपासला. संपादणूक
पातळी कमी असलेल्या मुलावर सक्ती केली जात नाहीत. ते जिथं रमतील तिथं
रमण्याचं ‘स्वातंत्र्य’ त्यांना असतं.
भराडे यांनी मानसशास्त्राचा अभ्यास करण्याच्या आणि मुलांना समजून घेण्याच्या हेतूनं एक डिप्लोमा केला. त्यातून आयुष्याकडं पाहण्याचा दृष्टीकोन बदलला. अधिकारीपदाची ‘झूल’ आपोआप गळून पडली! शिक्षकांसमोर खरोखरच काही अडचणी, प्रश्न उभे असल्याचं दिसलं. तेव्हा त्या स्वतः त्यांच्या मदतीला धावून गेल्या. ‘बॉसगिरी’पेक्षा एक सहकारी म्हणून काम करण्याला प्राधान्य दिलं. शिक्षकांना विश्वासात घेतलं. त्यांच्यावर विश्वास टाकला. तर काय होऊ शकतं, याचा वस्तूपाठ भराडे यांनी प्रत्यक्ष कामातून दाखवून दिलाय. लेखक आणि गट शिक्षण अधिकारी नामदेव माळी यांच्यासोबत काम करताना समज विकसित होत गेल्याचे त्या आवर्जून सांगतात.

गेल्या काही वर्षांपासून शिक्षणाचे संदर्भ बदलताहेत. नवे परवाह येताहेत.
रचनावाद आता परवलीचा शब्द बनलाय. या शैक्षणिक वर्षापासून भराडे यांनी
त्यांच्या कार्यक्षेत्रात पहिलीपासून ज्ञानरचनावादी पद्धतीने संपूर्ण
कामकाज सुरु केलेय. म्हणजे असं की, शिक्षकांनी ‘शिकवायचे’ नाही. मुलांना
‘शिकण्या’स मदत तेवढी करायची! सुलभकाच्या भूमिकेत शिक्षक दिसताहेत. दर
शनिवारी शाळेत आठवडे बाजार भरतो. पहिलीची मुलं विक्रेते असतात. मोठी मुलं
त्यांना मदतीला असतात. शाळेच्या शेतातला भाजीपाला आणि गोष्टी विक्रीसाठी
ठेवलेल्या असतात. सारे गावकरी बाजारकरू! पालक काही तरी खरेदी करताना कौतुक
भरल्या नजरेनं हे सगळं पाहात असतात. वीस रुपयांपर्यंतचा व्यवहार ही मुलं
इतक्या लहान वयात आत्मविश्वासाने करताहेत. दोनशे रुपयांपासून एक
हजारापर्यंत बाजारापर्यंतची ‘उलाढाल’ येथे होते. गणिती क्रिया, व्यवहार
ज्ञानासोबत आपली बाजू सामोर्च्यला पटवून देणं, नम्रतेनं वागणं, माणुसकी,
संवेदनशीलता असं बरेचसं ‘शिक्षण’ तेही अनुभवातून होतंय! आलेल्या पैशांतून
गरजू मुलांना मदत केली जाते. कोणी लेझीम पथकाचा युनिफॉर्म घेतला तर कोणी
आणखीन काही. अशाप्रकारे शाळांची छोटी-मोठी गरज यातून भागवली जाते. Activity
based पद्धतीने कामकाज सुरु झालेले बहुदा हे राज्यातले पहिलेच बीट असावे!
गट पद्धतीचा वापर, प्रश्न निर्मिती, स्वाध्याय कार्ड, झांजपथक, लेझीमपथक, एरोबिक्स, दोरी उड्या पथक, लगोरी, गोट्या, जिभल्या अशा पारंपारिक खेळांना प्रोत्साहन, विचारा तुम्ही सांगतो आम्ही, बालसभा, आठवड्याला प्रत्येक वर्गाची प्रश्नमंजुषा यासोबत ‘पीपल्स अॅक्शन फॉर लाईफ सेविंग’(‘पाल्स’) या उपक्रमात मुलं खाऊच्या पैशातून बचत करून त्यातून एखाद्या गरजू मुलाला मदत करतात. त्याचे नियोजन तेच करतात. ‘वही वाचवा’सारख्या उपक्रमात मुलांना समासापासून लिहायला जाते. त्यातून एका वहीत २० पाने वाचतात. दहा वह्यांमध्ये एक वही वाचते! पर्यावरणासारख्या विषयावर निबंध आणि भाषण स्पर्धा घेण्यापेक्षा तोच विचार बालमनावर असा कृतीतून रुजवला जातोय.
जपान, अमेरिका, स्वीडन येथील अभ्यासकांनी शाळांना भेट देऊन येथील प्रयोग समजून घेतले. कॅलेलिना या अमेरिकेतल्या मान्यवर शिक्षणतज्ञ ज्ञानरचनावाद या विचारधारेवर ३० वर्षांपासून काम करीत आहेत. त्यांनी नुकतीच भेट देऊन बारकाईने कामकाज समजून घेतलं. खूप प्रभावित झाल्या. जाताना त्यांनी प्रतिभा भराडे यांना थेट मिठीच मारली!
दर महिन्याला कामाचा आढावा घेतला जातो. विशेषतः सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापनाबाबत आढावा आणि नियोजन होतं. यश-अपयश बघून पुढचे पाऊल टाकलं जातं. शिक्षकांमध्ये परस्पर सुसंवाद आणि निकोप आणि विधायक स्पर्धा निर्माण झालीय. त्यातून शाळा आणि पर्यायानं मुलंही समृद्ध होताहेत. ज्या शाळेचे कामकाज चांगले असेल किंवा एखाद्या बाबीसाठी गरज असेल तेव्हा त्यांना केंद्रप्रमुख स्वतःच्या खिशातून हजार रुपयाचे बक्षीस/मदत देतात. शिक्षकांनी स्वतःच्या पैशातून शाळा सजवल्यात. कोणीही अधिकारी आला तरी शिक्षकांच्या मनावर तणाव नसतो. त्यांची धावपळ होत नाही. शांत चित्तानं त्याचं काम सुरु असतं. शाळेतील उपक्रमांची ते माहिती देतात. ज्या शिक्षकाकडे जे कौशल्य आहे ते वापरले जाते.
चारही दिशांनी मदतीचा ओघ सुरु झालाय. ‘लोकांची मदत आणि समाजाचा विश्वास यामुळे आमची सगळ्यांची जबाबदारी दिवसेंदिवस वाढत आहे’, असे भराडे सांगतात.
शिक्षकांच्या बदल्यांबाबत त्या खंत व्यक्त करतात. रुजवलेलं विरजण बाजूला जातं. नवीन शिक्षकाला सगळा प्रकल्प समजायला, त्याच्याशी जुळवून घ्यायला वेळ जातो. एका गोष्टीची त्यांना खात्री आहे, ती म्हणजे बदलून गेलेले शिक्षक मूळ विचारापासून बाजूला जात नाहीत. हे काम काही एकाएकी उभे राहिले नाही. उपक्रम आखायचे. शिक्षकांना विश्वासात घेऊन यशस्वीरित्या राबवायचे. प्रेरणा दिली की प्रेम मिळते असे त्या सांगतात. ‘ कोणाला तरी दाखवण्यासाठी(‘शो’साठी) काम करू नका. आरंभशूर तर अजिबात होऊ नका.’ सामाजिक कार्यकर्ते गनीभाई यांनी कधीतरी वडिलकीच्या नात्यानं दिलेला सल्ला मोलाचा आहे, असं भराडे सांगतात.
‘कधी मनाविरुद्ध घडलं, अपयश आलं तर निराशा येत नाही का?’ यावर त्यां म्हणतात आम्ही सगळ्यांनी ठरवलेलंच आहे की, काही झालं तरी थकायचं नाही. थांबायचं नाही. हिरमोड होऊ द्यायचा नाही. जे करायचं ते मन लावून. झोकून देऊन. गावोगावी तिथल्या समजात प्रभाव असलेल्या व्यक्ती, सामाजिक कार्यकर्ते, शिक्षकांची खंबीर साथ, पालक-मुलांचा उत्साह वर्धक प्रतिसाद, वरिष्ठ अधिकाऱ्यांचा पाठिंबा यामुळे इथपर्यंत पोचता आलं, असं सांगत मदत करणाऱ्यांच्या प्रति कृतज्ञता त्या व्यक्त करतात. मला एकटीला हे शक्यच नव्हतं, असं त्या प्रांजळपणाने कबुल करतात. असं असलं तरी म्हणून त्यांच्या कामाचं मोल आणि महत्त्व कमी तसूभरही कमी होत नाही. राज्याच्या ग्रामीण भागात शिक्षण पुढे नेण्यासाठी धडपड करणाऱ्या महिला बोटांवर मोजण्याइक्याच आहेत. प्रतिभा भराडे त्या साखळीतली कडी आहेत. नोकरीव्यतिरिक्त व्यसनमुक्ती, विद्यार्थ्यांचे समुपदेशन आणि कौटुंबिक हिंसाचार असं काम कोणत्याही अपेक्षेशिवाय त्या करीत राहतात. म्हणूनच तर त्या अधिका-यापेक्षा ‘पेड सोशल वर्कर’ (पगार घेणारी कार्यकर्ती) म्हणून जास्त भावतात!हेच काम कोण्या स्वयंसेवी संस्थेनं केलं असतं तर त्याचा केवढा उदोउदो झाला असता. पण पुन्हा इथं सरकारी क्षेत्राची हेटाळणी करण्याचा तोच दृष्टीकोन डोकावतो. खासगी ते चांगले आणि सरकारी ते टूकारच असणार, असंच आपल्याकडं अजूनही मानलं जातंय. गरज आहे हा झापडबंद दृष्टीकोन बदलण्याची. भराडे आणि सहकाऱ्यांचं काम तेच तर सांगताय...

-शब्दांकन
भाऊसाहेब चासकर,माहेर,रतनगड कॉलनी, नवलेवाडी, ता.अकोले, जि.अहमदनगर.