माय मराठी संकेतस्थळावर आपले सहर्ष स्वागत !!! मराठी भाषेतील शैक्षणिक व्यासपीठ असणाऱ्या या संकेतस्थळावर एकूण 2 मेनूबार आहेत. याखालील इमेजेसवर क्लिक केल्यास डायरेक्ट त्याच्या वेबसाईटवर नेले जाईल. त्याखालील मेनूबार हा Dropdown मेनूबार असून त्याखालील मेनूवर क्लिक केल्यास त्याखालील सबमेनू येतो व सबमेनूप्रमाणे माहितीस्थळ दर्शविले जाते.ब्लॉगवरील हवी ती माहिती शोधण्यासाठी डावीकडील स्लाइडबारच्या वर search पर्यायाचा वापर करा. ब्लॉगवर उपलब्ध अफाट माहिती विश्वातून आपणास हवी ती माहिती शोधून देण्यास ते मदत करते.
  • ①मुख्यपृष्ठ
  • ② डाउनलोड➠
  • ③ज्ञानरचनावाद➠
  • ④Online कार्यशाळा➠
  • ⑤Imp वेब्स➠
  • ⑥उपक्रमांचे जग➠
  • ⑦ई-लर्नींग/शै.ॲप्स➠
  • वेळ आमावस्या

    वेळ आमावस्या


                मुळ कर्नाटकातील असणारा महाराष्ट्रातील लातूर व उस्मानाबाद जिल्ह्यासोबत शेजारील तालुक्यांमध्ये मार्गशीर्ष अमावस्या म्हणजेच वेळ अमावस्या मोठ्या उत्साहाने साजरी केली जातो.  ही दर्शवेळा अमावस्या म्हणूनही ओळखली जाते. मूळ कानडी शब्द "येळ्ळ अमावस्या" म्हणजे पेरणीनंतर येणारी सातवी अमावस्या म्हणजे येळी अमावस्या, याचाच अपभ्रंश होऊन वेळ अमावस्या शब्द रुढ झाला.
                  या दिवशी सकाळी लवकरच शेतकरी आपल्या घरपरिवारासह शेताकडे जातात. अगोदरच्या दिवशी कडब्यापासून तयार केलेल्या कोपीमध्ये शेतीत असणाऱ्या सर्व पिकांची व मातीपासून बनवलेल्या पांडवांची [पंचमहाभूते] पुजा करतात. तर एक व्यक्ती एका रंगविलेल्या माठामध्ये अंबिल भरून त्याचा गावातील ग्रामदेवतेस नैवेद्य दाखवून शेतात कोपीवर आणले जाते. ज्वारी व बाजरीचे उंडे, आंबट भात, सर्व भाज्यांपासून तयार केलेली "भज्जी", खीर, आंबिल असे एक ना अनेक पदार्थांचा नैवेद्य केला जातो.  प्रमुख व्यक्ती डोक्यावर घोंगडी घेऊन त्यावर अंबिलाचा माठ ठेऊन शेताला वेढा मारते, यावेळी एकजण पुढे ताटली वाजवितात तर एक व्यक्ती सोबत आणलेल्या नैवेद्याचा काला करून शेतात शिंपडते, सर्वजण तोंडातून ‘हर हर महादेव, वल गे वल गे, चांगल फल गे!, हर हरभरा, फिर गरगरा!' असे म्हणत कोपीभोवताली फेरी मारुन पुजा संपविली जाते. व बनविलेल्या सर्व पदार्थांचा प्रसाद म्हणून वनभोजनाच्या रुपात आस्वाद घेतात.
                 सणानिमीत्त एकमेकांना जेवण्यासाठी आमंत्रणे दिली जातात. ज्यांना शेती नाही अशांना आवर्जुन जेवायला शेतात बोलावले जाते. या दिवशी पोट मोठे होते म्हणून अनेक कोपींवर जाऊन जेवण केले जाते.  शहरी भागातील लोकांसाठी तर हा सण म्हणजे पर्वणी असतो. या दिवशी लातूर शहरात तर अघोषित संपच असतो. नेहमी वर्दळ असणारी गोलाईही माणसांची वाट पाहते. शहरे ओस व खेडी माणसांनी व आनंदाने हर्षोल्हासीत झालेली असतात.
                काही भागात या दिवशी पतंग उडविले जातात. तर काही भागातील लोक सायंकाळी गावात एकत्र जमून ताकदीचे खेळ खेळतात.
                 एकंदरीत विचार करता इतर सणांमध्ये आढळणारी निसर्गाची हानी या सणांत नाही! याउलट माणसाला निसर्गाजवळ घेऊन जाऊन त्याचे निसर्गाशी घट्ट नाते विणणारा हा सण ! रंगीत फुलांच्या मुकुटासह नटलेला करडा, कापणीसाठी आलेली तूर, परिपक्व होऊ लागलेला हरभरा, हवेच्या तालावर नाचणारा गहू, पाखरांना खुणावणारी पोटऱ्यातील ज्वारी असा चोहीकडे दिसणारा हिरवागार आणि प्रसन्न निसर्ग!  अशा वातावरणात ऊन, वारा, पाऊस या निसर्ग शक्तींसमोर नतमस्तक होऊन केलेली ही पुजा म्हणजे शेतकरी व निसर्गाची शतकानुशतके चालत आलेली भागीदारीच दर्शविते !

    शब्दांकन - सोमवंशी तानाजी 9011104464